मागील आठवड्यात ‘मी आणि नथुराम’ हे पुस्तक घरपोच आलं. त्यावेळी कुरियर आणणारे काका काहीसे वयस्कर होते. भर दुपारी आल्याने घाम पुसत पुसत त्यांनी पाणी मागितलं. आणि दिल्यावर त्यांनी विचारलं, की ‘असं विचारणं योग्य नाही, पण आत नक्की काय आहे?’
म्हटलं, ‘पुस्तक आहे’
त्यावर ते म्हणाले ‘चिकार खच येऊन पडलाय, अजून बऱ्याच ठिकाणी जायचं आहे.’
मग पुस्तकाचं नाव, लेखक प्रकाशक कोण थोडी चर्चा करून ते गेले.
सोशल मिडीयावर शरद पोंक्षे यांनी जे लिहिलं होतं की पुस्तकाची चौथी आवृत्ती देखील प्रकाशनापूर्वीच संपली आहे, ते किती खरं आहे हे तेव्हा जाणवलं.
खरंतर शरद पोंक्षे, हा माझा अतिशय आवडता अभिनेता, ते ही ‘वादळवाट’ मालिका सुरु होती तेव्हा पासून. त्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विषयावरील व्याख्यानाला मी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा गेले आहे. कारण, सावरकर यांच्याबद्दल जितकं प्रेम मला आहे, त्यांच्या बद्दल कुणी वाईट बोललं की जितकं माझं रक्त तापतं, तितकंच रक्त तापणारा, त्यांच्या बाजूने बोलणारा किंबहुना त्यांच्याबद्दल पसरलेले गैरसमज समाजातून दूर करणारा या क्षेत्रातला कुणीतरी आहे, हे चित्र माझ्यासाठी फार दिलासादायी आहे.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका केली होती आणि ते नाटक अनेक कारणांमुळे गाजलं. आणि त्यानंतर अनेक भूमिका करत त्यांनी आता लेखन क्षेत्रांत पाऊल टाकलं आहे.
मी आणि नथुराम :
हे शीर्षक वाचताच प्रचंड उत्सुकतेपोटी मी ते मागवलं आणि आता त्याच पुस्तकाविषयी ही पोस्ट.
खरंतर , ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या शीर्षकाचे नाटक करण्यास सुचणे, ते लिहिणे त्याचे दिग्दर्शन करणे, त्यात अभिनय करणे आणि असे काही नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर आणणे हे प्रचंड धाडसाचे काम होते.
धाडस या साठी की काही ऐतिहासिक घटना किंवा व्यक्ती काळाच्या पडद्याआड दडपून जातात, तर काहींना जाणीवपूर्वक दडपल्या जातं. इतिहास कसाही असला तरी तो कसा सांगितला गेला यावर बऱ्याचदा समाजाचं त्याबद्दलचं आकलन किंवा त्यांच्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो.
त्यात, नथुराम असाच इतिहासाच्या कोठडीत बंद केलेला. कारण त्याने राष्ट्रपिता गांधींना मारलं. मग त्याने हे का केलं हा प्रश्न उरतच नाही. केलं म्हणजे केलं….तो देशद्रोही.
बस !
आणि अशा या देशद्रोही ठरवलेल्या माणसावर नाटक? ते ही आपल्याच देशात?
धाडस !!!
हे खरंच धाडस होतं.
हे संपूर्ण पुस्तक आपल्याला या नाटकाचा असा धाडसी आणि तितकाच धगधगता प्रवास घडवून आणतं. मुळात नाटक म्हणजे बऱ्याच मराठी माणसांचा जिव्हाळ्याचा विषय. आणि यात फक्त पडद्यावरच्या नाटकाबद्दल नाही तर ‘या नाटकामुळे’ पडद्यामागेही घडलेल्या नाटकांची कहाणी आहे.
अनेक किस्से, अनेक प्रसंग, नाटकामुळे आलेले चांगले -वाईट अनुभव शरद पोंक्षे यांनी अतिशय सुंदरपणे शब्दबद्ध केले आहेत. लिखाणात उल्लेखनीय प्रामाणिकपणा आहे. भाषा सुद्धा अगदी समोर बसून गप्पा मारतोय अशीच. त्यामुळे सर्व चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.
आता हे पुस्तक केवळ शरदजींच्या आयुष्यातील एक पर्व म्हणून जरी वाचलं, तरी ते आपल्याला माणूस म्हणून या समाजात कसं वागायचं आणि संघर्षाच्या क्षणी आत्मबलावर खंबीरपणे कसं लढायचं हे शिकवून जातं.
तुम्ही जर ‘बरोबर आहात, तर कितीही वाईट प्रसंग आला तरी ‘सत्याच्या’ पाठीशी कुणीना कुणी उभं राहतंच आणि तुम्हांला त्यातून बाहेर काढतं, पण त्यासाठी लढा मात्र स्वतःच द्यावा लागतो. आणि तो अगदी निर्भीडपणे कसा द्यावा हे ‘मी आणि नथुराम’ शिकवतं.
गांधीजींच्या समर्थकांना त्यांचेच विरोधक म्हणावे अशी त्यांची वागणूक, विविध ठिकाणी, वेळोवेळी, नाट्यगृहाबाहेर आंदोलकांचा घेराव, नाटकाची बस जाळणे, नाटकाचे सामान जाळणे, स्टेजवर आंदोलकांनी येऊन त्रास देणे या आणि अशा अनेक प्रसंगांना शरदजींनी कसे तोंड दिले, हे वाचणे खरोखर मनोधैर्य वाढवणारे आहे.
ज्या महात्मा गांधीजीनी आयुष्यभर अहिंसात्मक भूमिकेचा प्रचार केला, त्यांच्याच समर्थकांनी मात्र या नाटकाच्या बाबतीत अगदी उलट आचरण केले. अगदी न्यायालयातून परवानगी मिळाल्या नंतरही अशी विचित्र वागणूक नाटकाला आणि सर्व टीमला मिळत राहिली. शरदजींना झालेला मानसिक त्रास किती गहन असेल याची कल्पनादेखील करवत नाही.
‘शरद पोंक्षे मुर्दाबाद’ च्या घोषणा कानी पडत असून देखील मी करत असलेलं काम जर देशाचं न्यायलय चूक ठरवत नाही, तर तुम्ही ते चूक म्हटलात तरी ते मी करणार असं म्हणत त्याच ताकदीने भूमिका करून, तुडुंब भरलेल्या नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट मिळवत त्यांनी नथुराम लोकांपर्यंत पोचवला. यातून, बरच काही शिकण्यासारखे आहे.
पुस्तकात त्या त्या वेळी वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या, झालेली बदनामी, नाटकाच्या जाहिरातींचे फोटोज, नाटकाला भेट देण्यास आलेल्या कलाकारांसोबत चे असे अनेक फोटोज आहेत, त्यामुळे त्या काळात फेरफटका मारून आल्यासारखे वाटते.
पुस्तके, नाटके किंवा इतर माध्यमातून इतिहास संशोधने यासाठीच व्हायला हवीत की कोणावरही अकारण अन्याय होऊ नये, तसेच कोणाचे अकारण उदात्तीकरण झाले असेल तर तेही लोकांसमोर यावे.
इथे एक आवर्जून इथे सांगावेसे वाटते, ते म्हणजे नथुराम ने केलेल्या कृत्याचं कुठल्याही प्रकारे समर्थन केले गेले नाही. फक्त, इतिहास म्हणून त्या घटनेकडे कसे पाहता येईल हे या नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे आणले, त्यामुळे नाण्याची दुसरीही बाजू समोर आली. आणि म्हणूनच, हे पुस्तक देखील महत्वाचे, ज्यातून आपल्या समाजाचं देखील अंतरंग समोर येतं.
या सर्व झाल्या जमेच्या बाजू. फक्त काही गोष्टी ज्या मला खटकल्या त्या म्हणजे, नाटकाच्या निर्मात्याने त्यांना पदोपदी दिलेला त्रास, उत्तम कलाकार असूनही न दिलेली योग्य रक्कम, किंवा कलाकारांच्या राहण्याची-खाण्यापिण्याची केलेली गैरसोय या बद्दल बऱ्याच ठिकाणी उल्लेख केला आहे, जो मला अनावश्यक वाटला. साधारण ४-५ प्रसंगानंतरच नाटकाच्या निर्मात्यांनी सर्व कलाकार, लेखक व दिग्दर्शकाबाबतीत अन्याय केला हे लक्षात आले होते. पण ते अगदी पुस्तक संपेपर्यंत त्यांनी लिहिले आहेत. ते कदाचित टाळता आले असते.
दुसरं असं, की ‘मी आणि नथुराम’ हे शीर्षक वाचल्यानंतर मला नथुराम गोडसे या व्यक्तीबद्दल वाचायला मिळेल असे वाटले होते. ज्यांनी इतकी वर्ष ही भूमिका केली, त्यांचा त्या व्यक्तिरेखेसाठी बराच अभ्यास झाला असणार, आणि त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल त्या नटा व्यतिरिक्त अजून जास्त कोण सांगणार अशी माझी समजूत होती. पण पुस्तक ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाबद्दल जास्त बोलतं. एवढंच!
बाकी, पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. आपल्यालाही आयुष्यात अनेकदा आपली बाजू योग्य आहे हे सांगतांना संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष पुस्तक वाचल्यानंतर इथून पुढे सहज करता येण्याजोगा वाटेल.
धन्यवाद !